For any details about the organisation please write to info@amgm.org
Contact us: 9820072143 / 8369597470
करोनाचा अभूतपूर्व असा हाहाकार आणि ‘निसर्ग” वादळाचा तडाखा यांना घाबरून स्वस्थ बसेल तो गिर्यारोहक कसला?
या दोन्ही आपत्तीने अनेकांची दाणादाण उडाली आणि त्यामुळे सारेच अस्वस्थ झाले. दूर डोंगर-दऱ्यातील व किल्ल्यांच्या आसपास वस्ती करून असलेल्या सगळ्यांचीच काळजी अनेकांना वाटू लागली. त्यातूनच मग AMGM च्या माध्यमातून अशा वाड्या-वस्त्यांचे आधी सर्वेक्षण व नंतर पद्धतशीर मदत कार्य सुरू करण्याची, अशा मदत कार्य करणाऱ्या व्यक्ती व अनेक संस्था यांना ही माहिती पुरवून त्यांनीच त्यांची प्रत्यक्ष मदत पोहचविणे असा पारदर्शक व सर्वांगीण विचार करून स्वयंसेवी कार्याचं एक मोहोळच उठवलं. महिना दीड-महिना चाललेल्या मानवतेच्या या कार्यात अनेक सद्गृहस्थ, देणगीदार, संस्था, सेवाभावी मंडळं व गिर्यारोहक यांनी निस्वार्थीपणे काम केले. स्वतःची सह्याद्रीशी असलेली बांधिलकी दाखवून दिली.
हे सगळे श्रेय त्यांचंच!
यात AMGM नेही अनेक ठिकाणी मदत पुरवली असली तरी मुख्यतः भूमिका होती ती समन्वयाची. AMGM च्या माध्यमातून केल्या गेलेल्या मदतीचा धावता आढावा आपल्या साऱ्यांच्या माहितीसाठी इथे एकत्रित देत आहोत…….
1) ऑफ बिट्स सह्याद्री या संस्थेच्या प्रीती पटेल यांचा या बाबतीत झपाटाच होता. तिने एकंदर 4 टप्प्यात हे मदतीचे काम केले आणि मदतीचा एक डोंगरच उभा केला. सेवा सहयोग-मुंबई, यंग झिंगारो, K2 adventure, चक्रम हायकर्स, आम्ही गिर्यारोहक, अनुभूती (सुदीप आठवले), Mileventure Treks, दुर्गसखा, दुर्गवीर प्रतिष्ठान व निसर्गमित्र, पनवेल अशा विविध संस्था तसेच अनेक व्यक्ती या साऱ्यांना एकत्र करून, त्यांचं साहाय्य घेऊन प्रीती पटेल हिने ऑफ बिट्स सह्याद्री संस्थेच्या माध्यमातून कामाचं एक उत्कृष्ट उदाहरणच गिर्यारोहण क्षेत्रासमोर ठेवले. कसारा ते कर्जत अशा मोठ्या पट्टयात दूर दूरच्या वाड्यात या साऱ्यांना मदत पोहचवली.
पहिल्या टप्प्यात कर्जत जवळील सांडशी, सालपे ते अगदी कळकराय वाडी या भागात 100 कुटुंबाना मदत केली.
दुसऱ्या टप्प्यात माथेरानच्या पायथ्याशी काटवनवाडी येथे 50 कुटुंब, तिसऱ्या टप्प्यात माथेरानच्याच पायथ्याच्या परिसरात गार्बेट, बुरुजवाडी, सोंडाई वाडी अशा आदिवासी वस्त्यांवर 280 कुटुंब, तर 4 थ्या टप्प्यात 300 kits कातकरवाडी, वाघवाडी अशा वस्त्यांवरील आदिवासी कुटुंबाना दिले. विशेष म्हणजे काही वाडीतील मुलांचं शिक्षण सुरू राहावं म्हणून या साऱ्यांनी काही मुलांना अभ्यासासाठी लागणाऱ्या वस्तूही पुरवल्या. सह्याद्रीच्या अनेक अवघड जागी व दूरस्थ वसलेल्या अशा साधारणतः 750 आदिवासी कुटुंबाना या संस्थेने मदतीचा हात दिला, माणुसकीचे दर्शन घडवले!
2) ट्रेकक्षितिज राहुल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखालील या संस्थेने सुधागड भागातील वादळग्रस्तांच्या मदत कार्याची जबादारी घेऊन त्या कार्यात अनेकांना सहभागी करून घेतले व सहकार्यही मिळवले. ट्रेकक्षितिज संस्थेने पाली परिसरातील घेरा सुधागड किल्याच्या पायथ्याशी दूर दूरच्या वाड्यात मदत पोहचवली.
पहिल्या फेरीत (11 जून 2020) 64 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व खाण सामान पुरविले. दुसऱ्या फेरीत (14 जून 2020) 12 कुटुंब व 2 समाज मंदिर आणि एका शाळेला 112 लोखंडी व 17 प्लास्टिक पत्रे पुरविले. निसर्ग वादळामुळे ज्यांच्या घरांची छपरे उडाली होती, त्यांच्यासाठी ही मदत अगदी योग्यच वेळी पोहचविण्यात आली. तिसऱ्या फेरीत (1 जुलै 2020) तब्बल 250 आदिवासी कुटुंबाना किराणा सामान व जीवनावश्यक वस्तू यांची मदत करण्यात आली. अशाप्रकारे एकंदर 350 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू, पत्रे अशी विविध मदत करण्यात आली. या कामासाठी त्यांना विवेकानंद सेवा मंडळ, AMGM, श्री निषाद गांधी, पाच्छापूर, दर्यागाव व इतर वाड्यांतील ग्रामस्थ इत्यादी लोकांनी मदत व सहकार्य केलं.
3) हेमंत जाधव (K2 cycles) च्या पुढाकाराने व सेन्ट्रल रेल्वे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब यांच्या सहकार्याने अनेक ठिकाणी मदत पोहचवण्यात आली. अगदी बदलापूरच्या चाळी ते गोरखगड पायथा आणि माथेरान परिसरातही या साऱ्यांनी मदत पोहचवली. माथेरान परिसरातील उंबरणे वाडी, माणगाव वाडी, आरकस वाडी, सोंडाई वाडी तर गोरखगड जवळील देहरी व नाखिंद पर्यंत आशा एकूण 8 वाड्या-वस्त्यांवर 400 कुटुंबाना (किट्स) मदत पोहचवली. या कामात जाणीव संस्था-ठाणे, Next Venture, ऑफ बिट्स सह्याद्री, वारली संस्था, आम्ही गिर्यारोहक इ. संस्था तसेच दत्त सुपर मार्केट, कर्जत यांचे श्री प्रसाद दगडे व संदीप मोकाशी, संतोष दगडे, सुदीप आठवले ई. व्यक्तींनीही खूप मदत केली.
4) सह्याद्री मित्र व SEESCAP – महाड परिसरात, सह्याद्री पर्वतात दुर्गम भागात राहणाऱ्या वाड्या वस्त्यापर्यंत काहीच मदत पोहचली नव्हती. त्या ग्रामस्थाप्रती असलेले कर्तव्य या भावनेने सह्याद्री मित्र व SEESCAP या संस्थेच्या वतीने माणगाव तालुक्यातील दुर्गम वाड्यावर, “अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ” कडून आलेली अन्नधान्याची मदत पोहचवली. त्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः ट्रेक करून, दिनांक 14 जुन 2020 रोजी कुर्डुगडाच्या पायथाच्या कुर्डुपेठ गावात साधारण 7 घराना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे धान्य वर पोचवले (150 किलो ). दिनांक 28 जून रोजी बडदे माच या गावातही सुमारे 270 किलो धान्य गिर्यारोहक व स्थानिक ग्रामस्थ यांनी ट्रेक करून पोचवले. बडदे माच ट्रेक मध्ये निजामपूर चे प्रसिद्ध डॉ अभिजित पाटस्कर यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. अशाप्रकारे सह्याद्रीमित्र व सिस्केप या महाड च्या दोन संस्थां व इतर व्यक्ती, निसर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांनी दुर्लक्षित भागावर लक्ष केंद्रित करून एक उदाहरणच ठेवले समाजासमोर.
5) यशवंती हायकर्स, खोपोली पद्माकर गायकवाड यांच्या पुढाकाराने संस्थेच्या वतीने वादळानंतर लगेचच खालापूर-खोपोली परिसरात सर्वेक्षण केलं. आदिवासी वाडी- चिंचवली व उंबरविरा वाडीत वादळाने काही घरांचे नुकसान झाले होते. यशवंती हायकर्सने उंबरविरा वाडीत मदत मिळवून द्यायला सहकार्य तर केलेच शिवाय स्वतःही अनेक कुटुंबाना मदत केली.
6) गिरिप्रेमी Covid 19 व “निसर्ग” वादळाने हाहाकार मांडल्यानंतर मदत कार्याचा धडाका लावून जणू एक मोहोळ उठवलं ते गिरिप्रेमी, पुणे यांनीच! Covid 19 मुळे अडचणीची परिस्थिती झालेल्या स्थलांतरित निराधार कामगारांच्या 2000 कुटुंबाना सतत 5 दिवस अन्नधान्य देण्यात आलं. वादळग्रस्तांसाठी 300 कुटुंबाना रेशन किट्स तर 60 घरांना छप्परासाठी टारपोलिन पुरवण्यात आलं. केवळ एवढंच नाही तर वैद्यकीय मदत, रक्तदान इ. सत्कार्यात गिरिप्रेमींनी स्वतःचा वेगळाच व आदर्शवत असा ठसा उमटवला. साधारणतः 7000 कुटुंबाना करोना साठीची औषधें (Arsenic ALB 30) तर पुरवलीच शिवाय 150 रक्तदात्यांचा एक ग्रुप करून त्यातील 60 जणांनी अगदी आणीबाणीच्या वेळी रक्तदान करून अनेक रोग्यांना आशेचा किरण दाखवला.
सर्वात महत्वाचे म्हणजे AMGM ने स्थापन केलेल्या Task Force (TF) च्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेला गिरिप्रेमीचे 70 उत्साही स्वयंसेवक Control room, Covid center, Swab center अशा विविध विभागात मदत करीत आहेत. TF च्या माध्यमातून प्रशासन व गिर्यारोहण संस्था एकत्र येऊन काम करता येतं याच हे नाविन्यपूर्ण व आशावादी असे उदाहरणच!
7) नाशिक TF – करोना नामक जैविक आपत्तिच्या सुरवातीच्या काळात म्हणजेच ६ एप्रिल २०२० ते १२ एप्रिल २०२० ह्या दिवसात टास्कफोर्स नाशिक टीमच्या सदस्यांनी दयानंद कोळी यांच्या नेतृत्वाखाली गरीब व गरजू आणि आपत्तिग्रस्त नागरीकांना मदत केली. नाशिकमधील त्रिमूर्ती चौक, पाथर्डी गाव अशा भागात अन्न वाटपाच्या कार्यात या साऱ्यांनी नाशिक जिल्हा आपत्ति व्यवस्थापनास मदत केली. तसेच याच TF च्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र म्हणूनहि कार्य करण्यासाठी आपली तयारी ठेवली होती. शिवाय दिनांक ३-४ जून२०२० निसर्ग चक्रीवादळात नाशिक जिल्हा आपत्ति व्यवस्थापनाच्या शोध व बचाव दलास बॅकअप म्हणून नाशिक टास्कफोर्स कार्यरत होते.
8) कर्तव्य प्रतिष्ठान, पोलादपूर यांनी 60 गरीब परिवाराना फुड्स पॅकेट वाटप केले. शिवाय मजूर, क्वारंटाईन परिवार, सफाई कामगार व हातगाडी वाले यांना 500 सॅनिटायझर व 1000 मास्क यांचे वाटप केले. चाकरमानी परिवारांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी साहाय्य केलं.
9) कोल्हापूर – दुर्ग अभ्यासक डॉ श्री अमर अडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी, “पावनखिंड – पन्हाळा ते विशाळगड” हा सुप्रसिद्ध ट्रेक आयोजित करणाऱ्या 100 संस्थांना एकत्र आणले व विश्वासात घेऊन यंदा हा ट्रेक कोणीही ठेवू नये असे आवाहन केले. या आवाहनाला साऱ्यांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ग्रामीण व अंतस्थ भागात करोनाची लागण टाळण्याचा एक स्तुत्य उपक्रम केला.
10) वाय. झेड. संस्थे तर्फे उदरनिर्वाह साठी राजगड किल्यावर अवलंबून असलेल्या पांच कुटुंबियांना रोख आर्थिक मदत व एक महिन्याचे रेशन देण्यात आले. तसेच AMGMच्या माध्यमातून होणा-या जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपासाठी एकूण रू. 85,600/- ची आर्थिक मदत देण्यात आली. कांदिवली YHA व आशिष भंडारी* अशासारख्या अनेकांनीही सढळ हस्ते मदत करून अशा कामाला मोलाचा हातभार लावला. कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवलं.
सहयाद्रीच्या आड वाटेवरच्या व दुर्लक्षित वस्त्यांवर व आदिवासींना या साऱ्यांनीच व इतर अनेकांनीही अशी मदत करून जे काम केले आहे ते गिर्यारोहण क्षेत्रातील अभूतपूर्व असे उदाहरण आहे. अशाप्रकारे ज्यांनी ज्यांनी साहाय्य केलं, देणगी दिली, मार्गदर्शन केले, माहिती पुरवली, प्रत्यक्ष वेळ काढून धावून गेले अशा ज्ञात व अज्ञात साऱ्यांचेच मनःपूर्वक अभिनंदन व लाख लाख धन्यवाद!
आपले विनीत
उमेश झिरपे, अध्यक्ष
ऋषिकेश यादव, कार्यकारी अध्यक्ष
(अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ)